Wednesday, 21 December 2016

मिश्र पालेभाज्यांचे सूप - Green Soup

वेळ: २५ मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी

साहित्य:
२ कप भरून आवडीच्या कोवळ्या पालेभाज्या (पालक, माठ, चवळी, थोडासा पुदिना, अगदी थोडीशी अंबाडी किंवा चुका)
२ टिस्पून बटर
६-७ लसणीच्या पाकळ्या,एकदम बारीक चिरून
१ लहान कांदा, बारीक चिरून
१/२ टिस्पून मिरची पेस्ट
२ ते ३ टिस्पून क्रीम
२ चिमटी दालचिनी पावडर
चवीपुरते मीठ आणि मिरपूड

कृती:
१) पालेभाज्या निवडून घ्याव्यात. मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. १/२ चमचा मीठ घालावे.
२) पाणी उकळले की त्यात निवडलेल्या भाज्या घालाव्यात. २-४ मिनिटे उकळवावे. भाज्या चाळणीत काढून त्यावर गार पाणी घालावे. पाणी निथळून टाकावे. भाज्यांची प्युरी करावी.
३) बटर कढईत गरम करून त्यावर लसुण परतावी. थोडी गुलाबी झाली की चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईस्तोवर परतावे. पालेभाज्यांची प्युरी घालावी. लागल्यास पाणी घालावे.
४) चवीनुसार मीठ, मिरची पेस्ट घालावी. ५ मिनिटे मध्यम आचेवर उकळी काढावी. दालचिनी पावडर आणि मिरपूड घालून मिक्स करावे.
सूप बोलमध्ये वाढावे. वरून क्रीम घालावे.
सूप नुसते सर्व्ह न करता त्याबरोबर कुरकुरीत क्रॅकर्स किंवा क्रूटॉन्स द्यावे.

टीप:
१) पालेभाज्या उकळवताना झाकण ठेवू नये, रंग काळपट येतो.
२) पालेभाज्या जर जुन असतील तर प्युरी केल्यावर चाळणीवर गाळून घ्याव्यात.
३) मेथी, शेपू अशा कडवट किंवा उग्र पालेभाज्या टाळाव्यात. तसेच अंबाडी, आंबट चुका फक्त चवीपुरता वापरावा. जास्त वापरल्यास सूप आंबट होईल.

Boondi Ladu

वेळ: ३० ते ४० मिनीटे
वाढणी: ८ मध्यम लाडू

साहित्य:
१ कप बेसन
१ कप साखर 
वेलची पूड
केशर
तळण्यासाठी तूप किंवा तेल
बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे

कृती:
१) बेसनात १ चमचा तूप घालावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. पीठ घट्टही नको आणि पातळसुद्धा नको. गुठळ्या राहू देउ नयेत.
२) कढईत तूप गरम करून आच मध्यम ठेवावी.
३) कढईवर झारा धरून भिजवलेल्या पीठातील थोडे पीठ घालावे. बुंदी पाडाव्यात. बुंदी तळल्या गेल्या कि दुसऱ्या झाऱ्याने बुंदी तूपातून काढाव्यात. पेपरवर काढाव्यात.
४) झाऱ्यावर लागलेले पीठ हाताने साफ करून झारा धुवून पुसून घ्यावा. परत तीच कृती करून सर्व बुंदी तळून घ्याव्यात.
५) साखरेमध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक बनवावा. पाकात वेलची केशर घालावे. पाकात बुंदी घालून ढवळावे. मिश्रण अधून मधून ढवळावे. पाक शोषला गेला कि लाडू वळावेत.

स्वीट कचोरी

वेळ: ३५ मिनिटे
वाढणी: १५ मध्यम कचोऱ्या

साहित्य:
:::सारण:::
१ कप ताजा खवलेला नारळ
१/२ कप साखर किंवा चवीनुसार
२ टेस्पून काजू तुकडा
२ टेस्पून बेदाणे
१/४ टिस्पून जिरे
चिमुटभर मिठ
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
:::कव्हरसाठी:::
३ मध्यम बटाटे, उकडून सोललेले
५ ते ६ टेस्पून शिंगाडा पीठ
चिमुटभर मिठ
इतर साहित्य::
तूप, कचोऱ्या तळण्यासाठी

कृती:
१) बटाटा कुस्करून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नये. मिठ घालावे. मध्यम घट्ट गोळा होईल इतपत शिंगाडा पीठ घालावे. पीठ मळताना लागल्यास थोडेसे तूप घ्यावे. झाकून ठेवावे.
२) नारळ, साखर, काजू, बेदाणे, जिरे, चिमुटभर मिठ आणि बारीक चिरलेली मिरची असे सर्व मिक्स करावे.
३) मळलेल्या बटाटा-शिंगाडा पीठाचे दीड इंचाचे गोळे करावे. लहान प्लास्टिकचा जाड पेपर घेउन त्याला तुपाचा हात लावावा. तळव्यांनाही तूप लावावे. एक लहान गोळा घेउन प्लास्टिकवर थापावा किंवा लाटण्याने अलगद लाटावा. लाटलेली पारी हातात घ्यावी. त्यात चमचाभर सारण घालावे. पारीच्या कडा एकत्र करून कचोरी तयार करावी. अशाप्रकारे कचोऱ्या तयार कराव्यात.
४) मध्यम आचेवर तुपात तळून घ्याव्यात.
तयार कचोऱ्या गरमच सर्व्ह कराव्यात. यांबरोबर गोड दही किंवा साखर घातलेले दही सर्व्ह करावे.

टीपा:
१) कचोऱ्या आधी भरून ठेवून काही तासांनी तळू नये. साखर आणि नारळ एकत्र केल्याने साखर वितळते आणि बाहेरील आवरण ओलसर होते. म्हणून कचोऱ्या भरून लगेच तळाव्यात.
२) उपासाचे दुसरे कोणतेही पीठ जसे साबुदाणा, वरी, राजगिरा इत्यादी वापरले तरी चालेल.

सुरणाचा किस

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

साहित्य:
२ कप सुरणाचा किस
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जीरे
२-३ हिरव्या मिरच्या, मध्यम तुकडे
२ ते ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मीठ आणि साखर
आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि ओलं खोबरं

कृती:
१) सुरणाचा किस थोडावेळ आमसुलाच्या पाण्यात घालून ठेवावा. यामुळे सुरणाची खाज निघून जाते. नंतर पिळून घ्यावा.
२) कढईत तूप गरम करून त्यात जीरे, मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात सुरणाचा किस घालावा. शेंगदाण्याचा कूट, आणि मीठ घालावे.
३) मंद आचेवर वाफ काढावी. सुरण शिजले की साखर घालावी. कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून मिक्स करावे.
गरम गरम सुरणाचा किस सर्व्ह करावा.

मॅंगो-मूस

काही पदार्थांची ओळखच जर चुकीच्या पद्धतीने झाली तर पुढे त्यांचे नावही नको वाटते. होस्टेलच्या मेसनी बदनाम केलेल्या कोबी, टिंडा वगैरे भाज्या किंवा पानात पडताना वाजणारे अर्धेकच्चे शिजलेले टणटणाटण वाटाणे वगैरेंच्या कथा घराघरांतून चघळल्या जातात. मॅंगोमूस या प्रकाराची ओळखही माझ्यासाठी चुकीच्या प्रकाराने झाली होती; प्लॅस्टिकच्या डब्यांतून मिळणारे, वेगवेगळ्या प्रीझर्वेटिव्ह्जनी, कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वादांनी भरलेले, आंब्याच्या मूळ स्वादाशी चुकूनही साधर्म्य नसणारे ते मॅंगोमूस! ओळखीच्या कोणाच्यातरी मुलांना आवडायचे म्हणून त्यांच्याकडे खाऊन पाहिले तर त्यानंतर मॅंगोमूसचे नाव काढले तरी नको वाटायचे. नंतर आमच्या घराजवळच्या एका बेकरीत मिळणारा मॅंगोमूस-केक खाण्याची हिम्मत केली कारण या बेकरीतले सारे पदार्थ ताजे बनविलेले असायचे आणि माझा तिथला अनुभव बराच चांगला होता, शिवाय त्या केकवर लावलेल्या ताज्या आंब्याच्या फोडी खूपच मोहक दिसत होत्या. केकदेखिल बेकरीच्या लौकिकाला साजेसाच होता, खासकरून त्यातला मॅंगोमूसचा थर खूपच स्वादिष्ट होता. तेंव्हापासून माझ्या मनातली या पदार्थाविषयीची आढी दूर झाली. बऱ्याच वेगवेगळ्या प्रयत्नांनंतर अलिकडे मला या मॅंगोमूसच्या कृतीचे गणित पक्के जमले आणि मग आंब्याच्या दिवसांत हे अनेकदा बनविले गेले.
आंब्याच्या पदार्थांमध्ये लिंबू (लाईम) वापरले तर त्याचा स्वाद वाढतो असा माझा अनुभव आहे, त्यामुळे त्याची एकसुरी गोडी थोडी कमी होते आणि त्यात लिंबाची (लाईमची) सालही किसून वापरली तर उन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या स्वादाने तजेला येतो म्हणून मी या दोन्हींचा वापर या मूज मध्ये करते. मूज सेट होण्यासाठी जिलेटीन वापरले जाते; मी सामान्यत: लिफ जिलेटीन वापरते आणि तेदेखील अगदी बेताने, कारण जास्त जिलेटीन वापरले तर मूज हलके न होता फारच गच्च व चिवट होते. लिफ जिलेटीन न मिळाल्यास पावडर जिलेटीनचे सात ग्रॅमचे पाकीट (चार जिलेटीन लीव्ह्जसाठी) वापरता येते. मी या कृतीत अंड्याचा पांढरा भाग फेटून वापरला आहे पण अनेकांना कच्चे अंडे वापरण्याबद्दल जरा शंका असते. माझ्या अनुभवाप्रमाणे, अंड्याला येणारा वास हा मुख्यत: त्याच्या पिवळ्या भागातून येतो, त्यामुळे पांढरा भाग फेटून वापरल्याने पदार्थाला अंड्याचा वास असा काही येत नाही पण वापरल्यामुळे पदार्थ हलका व्हायला खूप मदत होते. तरीही नको असल्यास अंडे वगळूनही मूस बनविता येते आणि तेही चांगले होते. माझ्या कृतीत मी सावर (sour)  क्रीम वापरले आहे पण ते उपलब्ध नसल्यास, क्रीमचे प्रमाण दुप्पट करावे. ताज्या आंब्याच्या दिवसात आंब्याचा रस मिक्सरवर एकसारखा करून वापरता येईल आणि इतरवेळेस मॅंगोपल्प वापरता येईल पण तो चांगल्या प्रतीचा आहे याची खात्री करून घ्यावी. शिवाय मॅंगोपल्पमध्ये साखर घातलेली असल्यास त्याप्रमाणे साखरेचे प्रमाणही आवडेल त्या प्रमाणात कमी करावे लागेल.

साहित्य: मॅंगोपल्प किंवा ताज्या आं
ब्याचा रस ४०० ग्रॅम (दीड मोठे कप)
पाऊण कप साखर
लिफ जिलेटीनची चार पाने
चार टेबलस्पून सावर (sour) क्रीम
डबल क्रीम १२५ मिली
१ हिरवे लिंबू (लाईम) रस आणि साल किसून
२ अंड्यांचा पांढरा भाग
प्रथम जिलेटीनची पाने गार पाण्यात भिजवून ठेवावीत. एका भांड्यात आंब्याच्या रसापैकी अर्ध्या रसात लिंबाचा रस, लिंबाची किसलेली साल आणि साखर मिसळून तो आचेवर ठेवावा व साधारण उकळीला आल्यावर बाजूला काढून ठेवावा.

मऊ झालेली जिलेटीनची पाने पिळून घेऊन गरम रसातच मिसळावीत व हे मिश्रण गार होऊ द्यावे. उरलेल्या रसात सावर क्रीम मिसळून फेटावे, गार झालेले आंब्याचे मिश्रण त्यात घालावे व मिसळावे, डबल क्रीम फेटून घ्यावे व तेही त्यात हलक्या हातावे मिसळावे.

अंड्याचा पांढरा भाग त्याचे तुरे उभारेपर्यंत फेटावा. थोडेथोडे करत अंड्याचा फेस आंब्याच्या मिश्रणात हलक्या हाताने मिसळावे. सारे पदार्थ चांगले मिसळले तर जायला हवेत पण ते करताना त्यात शक्य तेवढी हवा राहू द्यावी म्हणजे मूस चांगले हलके होईल.
हे मिश्रण हव्या त्या आकाराच्या ग्लासेसमध्ये ओतून सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये (फ्रीजरमध्ये नव्हे!)  ठेवावे.

साधारणत: चार तासात मूस सेट होईल. खायला देताना वर ताज्या आंब्याच्या फोडी घालाव्यात हे वेगळे सांगायला नकोच!